Saturday, January 9, 2010

वाटते सानुली


या कविता मी लहान पणापासून बाबांकडून ऐकत आलो आहे  - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे


वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
कधी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
लावूनी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परी जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशा-दिशांतून फिरता उधळून द्यावा
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भूळभूळ तिरी
वेळूच्या गुंजी वाजवूनी अलगुज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा


Monday, January 4, 2010

लाडकी बाहुली


या कविता मी लहान पणापासून बाबांकडून ऐकत आलो आहे  - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे.

लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केसही सुंदर काळे कुरळे
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडती
मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपुनी म्हटले साई-सूटय-हो या या
किती शोध-शोधली परी न कोठे दिसली
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली
वाटते सारखे जावे त्याच  ठिकाणी
शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण पाऊस संततधार
खल मुळी न तिजला वर झोंबे फार
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला\
पाहुनी  दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपर्या रंग हि गेला उडून
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी



सूर्योदय

या कविता मी लहान पणापासून बाबांकडून ऐकत आलो आहे  - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे.


बघ आई आकाशात सूर्य हा आला
पांघरून अंगावर भरजरी शेला
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी
सोनियेच्या लाविलेल्या आत झालरी
केशराचे घातले हे सडे भूवरी
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी
डोंगराच्या आडुनी हा डोकावी हळू
आणि फुले गुलाबाची लागे उधळू
पाखरांच्या संगे याची सोबत छान
गाती बघ कशी याला गोड गायन
मंद वारा जागवितो साऱ्या जगाला
म्हणत असे उठा उठा मित्र हा आला

श्रावण बाळ आणी दशरथ राजा


या कविता मी लहान पणापासून ऐकत आलो आहे बाबांकडून - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे.

दशरथ राजाच्या हातून जेंव्हा चुकून श्रावण बाळाला बाण लागतो - त्याचे वर्णन करणारी हि कविता

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हहळला   श्रावण बाळ
आ आई ग. दीर्घ फोडुनी हाक
तो पडला जाउनी झोक
हे राजाच्या श्रवणी पड़ता कानी
हृदयाचे जाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुज्या नाशाला
मी पापी कारण बाळा
मग कळवळुनी न्रुपास बोले बाळ
कशी तुम्ही साधली वेळ
मम  म्हातारे माय-बाप तान्हेले
तरु खाली असती बसले
कावड त्यांची घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरुनी झारी
जो परत फिरे तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला
मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
या वृद्धपणी मीच एक आधार
सेवेस आता मुकणार

काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्या मागे

आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका काही
ही विनंती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होऊनीया श्रावण बाळ

परी झाकुनी हे सत्य कसे राहील
विधिलेख न होई फोल
घ्या झारी ही जातो त्याचा तोल

लागला जावया खोल
सोडिला श्वास शेवटला
तो जीव-विहग फडफडला
तनुपंजर सोडुनी गेला
दशरथ राजा रडला धाई धाई
अडखळला ठाई ठाई

Saturday, January 2, 2010

अश्वत्थाम्याची गोष्ट

अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा. द्रोणाचार्य द्रुपद राजाकडे गायीच दान मागण्यासाठी का गेले त्याची पार्श्वभूमी सांगणारी हि कविता.

धावत धावत आला बालक
मीठी मारुनी म्हणतो आई
हरिणीला जणू बिलगे श्रावक
न कळे कसली इतुकी घाई

अपूर्व सुन्दर अतिशय सुन्दर
ओळख आई काय पाहिले
खार नाचरी पोपट चिमणा
मोर मनोहर छे छे चुकले

श्रेष्ठींच्या नव रम्य मंदिरी
आजच गेलो खेळायाला 
पूनवेचे जणू शुभ्र चांदणे
खेळ संपता कुमार प्याला

काय असे हे सहज पुसे मी
टकमक दासी सगळ्या  बघती
कळे  न चुकले काय मला ते
पदर लावुनी मुखास हसती

कुमार हसला शुभ्र पेय ते
मटमट मिटक्या  मारीत  प्याला
अश्वत्थामा वेडा किती हा
टुकटुक करुनी मला  म्हणाला

रोज रोज मज सांज सकाळी
दूध देत असे माजी आई
नाव न ठावे  तुझ्या आईची
मुळीच तुजवर माया नहीं
 .............................
..............................
हे ऐकल्यावर अश्वत्थाम्याची आई त्याला पाण्यात पीठ मिसळून  पिण्यासाठी दूध म्हणून देते कारण गरिबीमुळे  त्याना
गाय पाळण शक्य नसत. नंतर ती त्याची माफी मागते आणि त्याला सांगते की तिनी त्याला दूध नहीं तर पीठ पाण्यात मिसळून दिल होत. ही सर्व कड़वी माझ्या  लक्षात नाहीत. शेवटची २ कड़वी खाली दिली आहेत.
..............................
.............................
असंख्य अगणित अश्वात्थामे
असंख्य अगणित त्यांच्या माता
रात्र न दिन दिसता भवताली
अस्वस्थता मम येते चित्ता

जखम आईच्या काळजातली
युगे युगे ही वाहत आहे
बुद्ध ख्रिस्त अन गाँधी आले
गेले तरी ती तशीच आहे