या कविता मी लहान पणापासून बाबांकडून ऐकत आलो आहे - सगळ्याचे कवी मला माहित नाहीत आणि सर्व कविता मला जशा पाठ आहेत तशा लिहिल्या आहेत. जर कोणाला कवीचे नाव माहिती असेल किंवा कवितेत काही चूक झाली असेल तर जरूर कळवावे
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
कधी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
लावूनी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परी जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशा-दिशांतून फिरता उधळून द्यावा
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भूळभूळ तिरी
वेळूच्या गुंजी वाजवूनी अलगुज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा